Monday, 12 October 2015

रब्बी हंगामातही द्या हुमणी नियंत्रणाकडे लक्ष

रब्बी हंगामातही द्या हुमणी नियंत्रणाकडे लक्ष

डॉ. बी. बी. भोसले 


हुमणी ही एक अतिशय नुकसानकारक बहुभक्षी कीड आहे. हुमणीची अळी जमिनीमध्ये राहून विविध पिकांच्या मुळ्या कुरतडते. त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. खरिपामध्ये मराठवाड्यात सोयाबीन, कापूस, ज्वारी, ऊस, बाजरी, मका, तूर, हळद, कांदा यासारख्या पिकांचे हुमणी प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रब्बी हंगामामध्येही पिकाच्या उगवणीनंतर हुमणीच्या अळ्या हरभरा, करडई, ज्वारी या पिकामध्ये त्रासदायक ठरण्याची शक्‍यता आहे. रोपावस्थेतच मुळ्या कुरतडल्यामुळे संपूर्ण रोप जाईल. अधिक प्रादुर्भावामध्ये दुबार पेरणीपर्यंत वेळ येऊ शकते. 

तसेच सध्या खरीप हंगामातील तूर, कापूस यासारची उभी पिकेही हुमणीच्या प्रादुर्भावामुळे वाळत आहेत. हुमणीची अळी अवस्था जुलै ते नोव्हेंबर - डिसेंबरपर्यंत असते. त्यानंतर ती कोषावस्थेत जाते. यासाठी या कालावधीत शेतकऱ्यांनी खालीलप्रमाणे हुमणीच्या नियंणत्रासाठी उपाययोजना कराव्यात. 

हुमणी नियंत्रण व्यवस्थापन - 
- खरिपातील पीक काढणीनंतर शेतामध्ये पाळी मारून घ्यावी. जमिनीतील अळ्या पृष्ठभागावर येऊन सूर्यप्रकाशामुळे किंवा पक्षी वेचून खाल्ल्याने काही प्रमाणात नियंत्रण मिळेल. 
- पिकामध्ये शक्‍य असल्यास आंतरमशागत करावी. उघड्या पडलेल्या अळ्या हाताने वेचून रॉकेलमिश्रित पाण्यात बुडवून मारून टाकावे. 
- पेरते वेळी फोरेट (10 टक्के दाणेदार) हे कीटकनाशक 25 किलो प्रति हेक्‍टरी या प्रमाणात जमिनीत मिसळावे. 
- मेटारायझिम ऍनिसोप्ली या उपयुक्त बुरशीचा 10 किलो प्रती हेक्‍टर या प्रमाणात जमिनीतून वापर करावा. त्यामुळे हुमणीच्या अळ्या रोगग्रस्त होतात. 
- फिप्रोनील (40 टक्के) अधिक इमिडाक्‍लोप्रीड (40 टक्के) हे संयुक्त कीडनाशक 4 ग्रॅम प्रति 10 लिटर प्रमाणे पिकाच्या खोडाभोवती आळवणी करावी. 
- वरील उपाययोजना या केवळ सद्यपरिस्थितीतील पिकांचे हुमणी अळ्यापासून होणारे नुकसान कमी करण्यासाठी आहेत. हुमणीच्या संपूर्णपणे नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी सामुदायिकरीत्या 2-3 वर्षे प्रौढ व अळ्या यांचे एकात्मिक नियंत्रण व्यवस्थापन करणे आवश्‍यक आहे. 

संपर्क - डॉ. बी. बी. भोसले, 9423437894. संचालक विस्तार शिक्षण -  
(विभागप्रुमख, कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.) 

No comments:

Post a Comment