रब्बी भाजीपाला लागवडीसाठी करा रोपवाटिका

          रब्बी भाजीपाला लागवडीसाठी करा रोपवाटिका


रब्बी हंगामात टोमॅटो, वांगी, फुलकोबी, पानकोबी, पालक, मेथी, कोथिंबीर, कांदा, लसूण आणि बटाटा यासारख्या भाजीपाला पिकांची लागवड प्रामुख्याने केली जाते. त्यासंदर्भात वाण निवड, रोपवाटिका व अन्य नियोजनाविषयी माहिती घेऊ. 

वाणांची निवड -
भाजीपाला पिकांचे सुधारित आणि संकरित वाण उपलब्ध आहेत.
- टोमॅटो - महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या धनश्री, भाग्यश्री या सुधारित जाती, तर राजश्री ही संकरित जात आहे.
- वांगी - अरुणा, कृष्णा, वैशाली, मंजू.
- फुलकोबी - स्नो-बॉल-16, पुसा स्नो-बाल-1, पुसा स्नो बॉल-2
- पालक - पुसा ज्योती, ऑल ग्रीन.
- मेथी - कसुरी.
- कांदा - फुले सफेद, एन-241, ए.एफ.एल.आर. पुणे, फुरसुंगी.
- लसूण - गोदावरी, यमुना सफेद.
- बटाटा - कुफरी ज्योती, कुफरी पुखराज.

रोपवाटिकेचे नियोजन - 
- टोमॅटो, वांगे, फुलकोबी, कोबी, कांदा या पिकांची ऑक्‍टोबरमध्ये गादीवाफ्यावर रोपे तयार करावीत. साधारणतः दीड महिन्यानंतर रोपे गादीवाफ्यावरून मुख्य शेतात स्थलांतरित करावीत.
- पालेभाज्यांचे बियाणे सरळ मुख्य शेतात पेरून लागवड करावी.
- लसूण पिकाची लागवड ही लसूण गाठीमधील पाकळ्या मोकळ्या करून करतात.
- बटाटे पिकाची लागवड ही बटाटे बेण्यापासून करतात.
- गादीवाफ्याची लांबी 3 मीटर, रुंदी 2 मीटर आणि उंची 15 सें. मी. असावी. प्रती वाफ्यास दोन पाट्या चांगले कुजलेले शेणखत आणि 200 ग्रॅम संयुक्त रासायनिक खत (151515 सारखे) द्यावे.
- खुरप्याच्या सहायाने खत व माती यांचे मिश्रण करून गादीवाफ्याला सम प्रमाणात पाणी मिळेल अशा पद्धतीने तयार करावेत.
- प्रती वाफ्यास मर रोग नियंत्रणासाठी 30 ते 40 ग्रॅम कॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड टाकावे.
- वाफ्याच्या रुंदीस समांतर 10 सें. मी. अंतरावर बोटाने 1 ते 2 सें. मी. खोलीच्या ओळी काढून त्यात बी पातळ पेरावे. सुरवातीला वाफ्यांना झारीने पाणी द्यावे.
- रोपांच्या जोमदार वाढीसाठी उगवणीनंतर 10 ते 15 दिवसांनी प्रत्येक वाफ्यास 50 ग्रॅम युरिया खत आणि 15 ते 20 ग्रॅम फोरेट हे कीडनाशक रोपांच्या दोन ओळीमध्ये काकरी पाडून द्यावे. नंतर हलके पाणी द्यावे.
- कीड रोगांच्या प्रादुर्भावानुसार शिफारशीप्रमाणे नियंत्रण उपाययोजना कराव्यात.
- लागवडीपूर्वी रोपांना पाण्याचा थोडा ताण दिल्यास रोपे कणखर होतात. लागवड करण्याअगोदर एकदिवस रोपांना भरपूर पाणी द्यावे. रोप लागवडीस 5 ते 6 आठवड्यांत तयार होते.

कांदा पिकाचे नियोजन - 
- कांदा पिकासाठी जमीन सुपीक मध्यम ते भारी रेतीमिश्रित तसेच पाण्याचा उत्तम निचरा होणारी निवडावी. खारवट व चोपण जमीन टाळावी. जमिनीचा सामू 6 ते 6.8 असावा.
- कांद्याची मुळे 5 ते 6 सें.मी. लांब असतात. त्यामुळे नांगरणी मध्यम खोल करावी. रोपांची लागवड रुंद वरंबा अथवा वाफ्यात करावी.
- कांदा पिकास लागवडीच्या वेळी 43 किलो युरिया अधिक 33 किलो पोटॅश द्यावे.

लसूण पिकाचे नियोजन - 
लसणाची लागवड हिवाळी हंगामात करता येते. लवकर घ्यावयाच्या पिकासाठी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये लागवड करून डिसेंबर-जानेवारीमध्ये काढणी होते. पण हे कंद साठवणीस योग्य नसतात. त्यामुळे मुख्य पीक म्हणून ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये लागवड करावी. त्याची मार्च ते एप्रिलपर्यंत काढणी होते. हे पीक मे-जून ते नोव्हेंबरपर्यंत साठविले जातात. थंडीचा कालावधी जेवढा जास्त मिळेल तेवढी पिकांची वाढ चांगली होऊन गड्ड्याचा आकार वाढतो. उशिरा लागवड केलेल्या पिकांमध्ये तापमान वाढल्यास पीक लवकर तयार होते. गड्डा लहान राहून तो साठवणुकीत टिकत नाही.
- लसणाची लागवड सप्टेंबरअखेर ते ऑक्‍टोबर 10 तारखेपर्यंत लागवड केल्यास स्थानिक परिस्थितीत अधिक उत्पादन मिळते.
- 2 मीटर बाय 1 मीटर आकाराच्या सपाट वाफ्यात 10 सें. मी. बाय 10 सें. मी. किंवा 12.5 सें. मी. बाय 7.5 सें. मी. अंतरावर लसणाच्या पाकळ्यांची टोकून लागवड करावी. काळ्या मातीत 2 ते 3 सें. मी. पेक्षा खोल लावू नयेत. वाफ्यांना लावणीचे वेळी 2 दिवस अगोदर ओलीत केल्यास टोकन करणे सोयीचे जाते. टोकन होताच हलके पाणी द्यावे. मध्यम मोठ्या आकाराच्या गड्ड्यांच्या वाणामध्ये 6-8 मि. मी. आकाराच्या पाकळ्या लागवडीसाठी वापराव्यात, तर मोठ्या गड्ड्यांच्या वाणांमध्ये 10 मि. मी. आकाराच्या पाकळ्या वापरल्यास उत्पादन अधिक येते.

बटाटा पिकाचे नियोजन - 
उत्तम निचऱ्याच्या जमिनीची उभी-आडवी नांगरट करून घ्यावी. त्यानंतर कुळवाच्या 2 ते 3 पाळ्या देऊन ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या पाळीपूर्वी 25 ते 30 गाड्या कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे.
- बटाटे बेणे निवडतांना पूर्ण वाढलेले त्यावर फुगलेले कोंब असावे. बटाटे 25 ते 30 ग्रॅम वजनाचे संपूर्ण अंड्याच्या आकाराचे असावे. लागवड 15 ऑक्‍टोबरनंतर करावी.
- नांगराने अथवा रीजरणे 50 ते 60 सें.मी. अंतरावर सरी-वरंबे करावे. त्यात 15 ते 20 सें.मी. अंतरावर बटाटा लागवड करावी. एकरी 8 ते 10 क्विंटल बेणे लागते.
- लागवडीपूर्वी जमीन प्रथम ओलावून घ्यावी.

पालेभाज्यांचे लागवड नियोजन - 
पालेभाज्यांचा सतत पुरवठा होण्याच्या दृष्टिकोनातून 10 ते 15 दिवसांच्या अंतराने बी पेरावे. साधारणपणे 3 बाय 2 मीटर सपाट वाफ्यात बी फेकून किंवा ओळीतून पेरावे. बियाण्यास थायरम 3 ग्रॅम प्रती किलो बियाण्यास चोळावे. बी ओळीतून पेरावे. बी ओळीतून पेरल्यास दोन ओळीत 22 सें. मी. अंतर ठेवावे. पालकाचे हेक्‍टरी 25 ते 30 बियाणे लागते. जमिनीच्या मगदुराप्रमाणे हेक्‍टरी 20 ते 25 गाड्या शेणखत, 150 ते 190 किलो नत्र, 88 किलो स्फुरद आणि 88 किलो पालाश या प्रमाणात खताची मात्रा शिफारस करण्यात आली आहे. फक्त मेथीच्या अधिक उत्पादनासाठी पेरणीनंतर 20 व्या आणि 25 व्या दिवशी 10 लिटर पाण्यात 25 ग्रॅम युरिया मिसळून पिकावर फवारणी केल्यास मेथीचे उत्पादन व प्रत वाढते. 


No comments:

Post a Comment