उसावरील प्रमुख रोग, किडींचे नियंत्रण


उसावरील प्रमुख रोग, किडींचे नियंत्रण
फोटो - लोकरी मावा

महाराष्ट्रात उसाच्या पिकावर विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांचा 

आणि किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्याध्ये तांबेरा, पोक्का बोईंग आणि 

पानावरील ठिपके या रोगांचा आणि खोड किडी, कांडी कीड, हुमणी, 

पांढरा लोकरी मावा, पिठ्या ढेकूण , खवले किड , पायरीला आणि पांढरी 

माशी या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो.

उसावरील प्रमुख रोग व उपाय :

1) तपकिरी ठिपके (ब्राऊन स्पॉट) : पश्चिम महाराष्ट्रातील जास्त 

पावसाच्या भागाध्ये लॉन्जिपस नावाच्या बुरशीमुळे मान्सून हंगामात हा 

बुरशीजन्य रोग आढळतो. अनुकूल वातावरण असल्यास रोगाची तीव्रता 

वाढून सर्व पानांवर त्याचा प्रादुर्भाव दिसून येतो. पानांवरील छोटे ठिपके 

एकमेकांत मिसळून मोठे ठिपके तयार झाल्यामुळे प्रकाशसंश्लेषण होत 

नाही. त्यामुळे उसाच्या उत्पादनावर आणि साखर उतार्‍यावर अनिष्ट 

परिणाम होतो. रोगाची लागण मोठ्या प्रमाणावर झाल्यास उसाच्या 

कांड्याची लांबी व जाडी कमी होते.


2) नयनाकृती ठिपके : हिवाळ्यात हेलमिन्थोस्पोरियम सॅकरी नावाच्या 

बुरशीमुळे हा रोग उसाच्या पानांवर दिसून येतो. रोगाची लागण 

पोंग्यातील 2 ते 3 कोवळ्या पानांवर लहान, पाणथळ ठिपक्याच्या 

स्वरूपात दिसून येते. असे गर्द ठिपके व लांबट रेषा एकमेकांत मीसळून 

पाने करपलेली दिसतात.

3) तांबेरा : उसाच्या पानावरच दिसून येणारा हा बुरशीजन्य रोग आहे. 

सुरवातीस बुरशीची लागण पानाच्या दोन्ही बाजूंना होऊन पानावर 

लहान, लांबट आकाराचे पिवळे ठिपके दिसतात. रोगग्रस्त ठिपक्यातील 

पेशी मरून पाने करपलेली दिसतात. प्रकाशसंश्लेषण क्रियेत व्यत्यय 

आल्याने उसाचे उत्पादन घटते.

4) पोक्का बोईंग : उसाच्या मुख्य वाढीच्या काळात म्हणजेच 3 ते 4 

महिन्यांच्या उसामध्ये मान्सूनपूर्व पडलेला वळीव पाऊस व मान्सूनमुळे 

वाढलेल्या हवेतील आर्द्रतेमुळे हा रोग पानावर मोठ्या प्रमाणावर दिसून 

येतो. उसाच्या पानावर पावसाच्या अथवा दवाच्या स्वरूपातील पाणी 

प्रामुख्याने रोगवाढीसाठी महत्त्वाचे व अनुकूल घटक आहे. पानावर 

ओलसरपणा असताना बिजाणू रुजून बुरशी तयार होते. ही बुरशी 

पानांच्या आंतरमशागत प्रवेश करून रोग निर्मिती करते. या रोगाचा 

प्रसार दुय्यम प्रसार हवेमार्फत व पाण्यामार्फत होतो.


रोगांचे नियंत्रण : उसाचे निरीक्षण करून रोगाची लक्षणे, तीव्रता व 

पिकाची अवस्था पाहून खालीलप्राणे उपाययोजना करावी.

1) मान्सून हंगामामध्ये रोगाच्या प्रादुर्भावाबाबत ऊसपिकाचे सर्वेक्षण 

अथवा पाहणी करून प्रतिबंधक शिफारशीत बुरशीनाशकाची फवारणी 

करावी. ऊस तुटून गेलेल्या जमिनीत पुनर्लागवड करायची असल्यास 

तुटून गेलेल्या उसाचे अवशेष गोळा करून त्यांचा नायनाट करावा.

2) निरोगी बियाणे मळ्यातील रोगमुक्त बियाणे लागवडीसाठी वापरावे. 

रोगप्रतिकारक जाती निवडून त्यांची लागवड करावी. योग्य निचरा 

होणार्‍या जमिनीत ऊस लागवड करावी. लागवडीसाठी रुंद सरी किंवा 

पट्टा पद्धतीचा अवलंब करावा.

3) नत्राची मात्रा वाढून शिफारशीनुसार द्यावी. जास्त वापर झाल्यास 

रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. पानांवरील तपकिरी ठिपके या बुरशीजन्य 

रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब अथवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 

यांपैकी कोणतेही एक बुरशीनाशक 0.3 टक्के (3 ग्रॅम प्रति लिटर पाणी) 

या प्रमाणात घेऊन 15 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या कराव्यात.

4) उसावर पोक्का बोईंग व शेंडाकूज रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास 

नियंत्रणासाठी 1 ग्रॅम कार्बेन्डॅझिम किंवा 2 ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोरायीड 

किंवा 3 ग्रॅम मॅन्कोझेब प्रति लिटर पाण्याध्ये मीसळून 10 ते 15 

दिवसांच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या कराव्यात.( प्रतिकारक्षम वाण –को 

86032 ).

5) उसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसल्यास 0.3 टक्के (3 ग्रॅम/ 

लि.पाणी) मॅन्कोझेब अथवा 0.1 टक्के टेबुकोन्याझोल (1 ग्रॅम/ लि.पाणी) 

10 ते 15 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 वेळा फवारावे.


उसावरील प्रमुख किडी :

1) खोडकीडा : खोडकिडीचा प्रादुर्भाव ऊस लागणीपासून ते मोठ्या 

बांधणीपर्यंत आढळून येतो. अंड्यातून नुकतीच बाहेर आलेली अळी 

रांगत अथवा चंदेरी धाग्याला लटकत उसाच्या खोडाजवळ येते. ही अळी 

खोडावरील मऊ पोंगा खाऊन उपजीविका करते व नंतर खोडाच्या आत 

शिरून उगवणार्‍या कोंबाला 7 ते 8 दिवसांत खाऊन टाकते. अळीने 

खाल्लेला पोंगा ओढल्यास सहज उपटून येतो व त्याचा उग्र वास येतो. 

किडीमुळे ऊस उशिरा तयार होतो, त्यामुळे उत्पादनात घट येते.

2) कांडीकीड : या किडीचा प्रादुर्भाव कांडी तयार झाल्यापासून 

ऊसतोडणीपर्यंत आढळतो. भरपूर तापमान, कमी आर्द्रता व कमी पाऊस 

यामुळे कांडीकिडीचा प्रादुर्भाव होण्यास मदत होते. या किडीमुळे उसाची 

वाढ कमी होते. कांड्या लहान राहून उसास पांगश्या फूटतात. पाचट 

काढल्यास त्यात विष्ठा व भुसा आढळून येतो.

3) लोकरी मावा : या किडीची पिले व प्रौढ पानाखाली स्थिर राहून 

अणकुचीदार सोंडेच्या सहाय्याने पानातील अन्नरस शोषण करतात. 

त्यामुळे पानाच्या कडा सुकतात. हा मावा पानावर मधासारखा चिकट 

पदार्थ सोडतो. त्यामुळे त्याखालील पानावर काळ्या रंगाच्या कॅप्नोडियम 

या बुरशीची वाढ झाल्यामुळे हे पान काळे पडते. त्यामुळे पानाची 

कर्बग्रहणाची प्रक्रिया मंदावते.

4) पिठ्या ढेकूण : कांडीवर पाचटाखाली लांबट गोल आकाराची, लालसर 

गुलाबी रंगाची अंगावर मेणचट आवरणाची पिले दिसतात. पिठ्या 

ढेकणाचा जास्त प्रादुर्भाव वाढल्यास उसाचे डोळे खराब होतात. ही कीड 

जमिनीखालील मुळांवर व फूटव्यांवर हल्ला करून नुकसान करते.

5) हुमणी : हुमणीचा प्रादुर्भाव नदीकाठच्या जमिनी, हलक्या मुरमाड 

जमिनी तसेच सखल भागाध्ये सर्वत्र आढळून येतो. या किडीमुळे पानाची 

शीर व पाने पिवळी होतात. ऊस सहजासहजी उपसून येतो. ऊस उपटला 

असता हुमणीच्या ‘सी' आकाराच्या पिवळसर रंगाच्या अळ्या दिसून 

येतात. दुर्लक्षित ऊसपिकाध्ये 80 ते 100 टक्के नुकसान होते.

6) पांढरी माशी : या किडीचा प्रादुर्भाव उन्हाळ्यात पाण्याचा ताण 

पडल्यास व पावसाळ्यात पाऊस लांबल्यास जास्त होतो. या किडीची 

पिलू अवस्था पानाच्या खालच्या बाजूस गोल, नाजूक, पांढरट पिले व 

कोष स्वरूपात असून, पानातील रस शोषून घेतात.

7) पायरीला / उसावरील पाकोळी : या कीडीची मादी पानाखाली किंवा 

बेचक्यात 40-50 अंडी पुंजक्यात घालते. या कीडीची पिल्ले व प्रौढ 

ऊसाच्या पानातील रस शोषून घेतात. त्यामुळे पानाचा हिरवेपणा कमी 

होवून ती पिवळी पडतात. ही कीड शरीरातून एक प्रकारचा चिकटगोड 

पदार्थ बाहेर सोडतो. त्यामुळे त्यावर काळ्या बुरशीची वाढ होवून पानावर 

काजळी पडल्यासारखा रंग चढून ऊसाच्या अन्न तयार करण्याच्या 

प्रक्रियेत व्यत्यय येतो. उसातील साखरेचे प्रमाण घटते. ऊसाच्या प्रतिवर 

व उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. 

8) खवले कीड : ही कीड ऊसाच्या पानातील व ऊसातील रस शोषून घेते 

त्यामुळे उस निस्तेज होतो आणि उसातील साखरेचे प्रमाण घटते.


किडीच्या नियंत्रणाचे उपाय :

1) शक्यतो हलक्या जमिनीत उसाची लागवड करू नये. उसाची लागण 

10 फेब्रुवारीपूर्वीच पट्टा पद्धतीने शिफारस केलेल्या हंगामातच करावी. 

शिफारशीत कीड प्रतिकारक जातींची (उदा. फूले 0265) लागवड करावी.

2) हुमणीच्या अळ्या आणि कोष नैसर्गिक शत्रूंना बळी पडण्यासाठी दोन 

नांगरटी जास्त कराव्यात. शेणखतामधूनच हुमणीच्या अळ्या शेतात 

जातात. त्यामुळे खताच्या प्रत्येक गाडीत 1 किलो 10 टक्के कार्बारील 

भुकटी सिळावी.

3) उसाची लागण करताना जमिनीत मेटारायझीयम अ‍ॅनिसोप्ली किंवा 

बिव्हेरिया बॅसियाना 25 किलो शेणखतातून किंवा शेणकाला करून 

जमिनीत प्रति हेक्टर मिसळल्यास हुमणी अळ्यांवर या बुरशी वाढून 

प्रादुर्भाव कमी होतो.

4) पहिला पाऊस पडल्याबरोबर बाभूळ, बोर व कडूनिंब इ. झाडांवर 

हुमणीचे भुंगेरे रात्री साडेसात ते साडेनऊ या काळात पाने खाण्यासाठी व 

मीलनासाठी एकत्र येतात. हे भुंगेरे गोळा करून नष्ट करावेत. तसेच, 

झाडांच्या फांद्या सवळून घ्याव्यात.

5) बेणे मळ्यातील निरोगी आणि कीडविरहित बेण्याची निवड करावी. 

किडलेल्या बेण्याचा लागवडीसाठी उपयोग करू नये. पिठ्या ढेकूण व 

खवले कीड नियंत्रणासाठी लागणीपूर्वी बेणे 300 मिलि. मॅलथिऑन 

किंवा 265 मिलि. डायमिथोएट 100 लिटर पाण्यात सिळून त्यात बेणे 

10 ते 15 मिनिटे बुडवावे व नंतर लागवड करावी.

6) उसाला एक ते दीड महिन्यानंतर बाळ बांधणी केल्यास, खोडकिडीचे 

पतंग बाहेर पडणारी छिद्रे बंद होण्यास मदत होईल व पतंग बाहेर पडणार 

नाहीत.

7) खोडकीडा व कांडीकीड यांच्या नियंत्रणासाठी ऊस लागवडीनंतर 40 ते 

45 दिवसांनी 50000 ट्रायकोग्रामा चिलोनीस या परोपजीवी कीडी प्रति 

हेक्टर या प्रमाणात साधारणतः 10 ते 15 दिवसांच्या अंतराने 4 ते 6 

वेळा सोडाव्यात. खोडकीड व कांडीकीड यांच्या नियंत्रणासाठी हेक्टरी 5 

कामगंध सापळे (ई.एस.बी/आय.एन.बी.ल्यूर) शेतात लावावेत.

8) पुरेशा प्रमाणात पालाशयुक्त खते वापरल्यास किडीचा प्रादुर्भाव कमी 

होतो. पिठ्या ढेकूण कीड नियंत्रणासाठी प्रादुर्भावित उसाचे खालील 

वाळलेले पाचट काढावे. अशावेळेस वरील 8-9 हिरवी पाने ठेवावीत. 

डायमीथोएट 30 टक्के प्रवाही 26 मिलि. अथवा डायक्लोरोव्हॉस 76 

टक्के प्रवाही 11 मिलि. प्रति 10 लिटर पाणी घेऊन फवारणी करावी.

9) पांढरी माशी नियंत्रणासाठी व्हर्टिसिलिअम लिकोनी (फूले बगीसाईड) 

1 किलो अधिक 1 लिटर दूध प्रति 200 लिटर पाण्यात मिसळून 10 ते 

15 दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात. फवारणी अगोदर 

औषध रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे.रासायनिक नियंत्रणासाठी 

ऑक्सिडिमेटोन मिथायील 3.2 मिलि किंवा डायमिथोएट 2.6 मिलि 

किंवा 2 मिलि मॅलथिऑन किंवा डायक्लोरोव्हास 1 मिलि प्रती लीटर 

पाण्यात मिसळून फवारावे.

10) हुमणीग्रस्त क्षेत्रात क्लोरोपायरीफोसची 2.5 लिटर 1000 लिटर 

पाण्यातून आळवणी करावी.

11) पाकोळी (पायरीला) चे नियंत्रणसाठी मॅलथिऑन 850 मिलि किंवा 

डायमिथोएट 1000 मिलि किंवा क्विनालफोस 1200 मिलि प्रती 1000 

लीटर पाण्यातून फवारावे. 

12) खवले कीडीचे नियंत्रणासाठी मॅलथिऑन 2000 मिलि किंवा 

डायमिथोएट 2650 मिलि प्रती 1000 लीटर पाण्यातून फवारावे.

13) पांढरा लोकरी मावाचे व्यवस्थापन करण्यासाठी सुरूवातीस 

किडग्रस्त पाने तोडून जाळून टाकावीत. डीफा अफीडोव्होरा या परभक्षी 

मित्र किटकाच्या हेक्टरी 1000 अळी/कोष प्रादुर्भावग्रस्त शेतात सोडावेत 

किंवा क्रायसोपा या परभक्षी मित्र किटकाचे 2500 अंडी/अळ्या प्रती 

हेक्टरी सोडाव्यात. जैविक मित्रकिडी सोडल्यावर 3 ते 4 आठवडे 

कीटकनाशक फवारू नये. रासायनिक पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी 

कीडीचा प्रादुर्भाव आढळल्यास ऑक्सिडिमेटोन मिथायील 25% प्रवाही 

600 मिलि 400 लीटर पाण्यात (लहान ऊस), 1050 मिलि 700 लीटर 

पाण्यात (मध्यम उस), 1500 मिलि 1000 लीटर पाण्यात (मोठा ऊस) 

मिसळून फवारावे. पहिल्या फवारणी नंतर एक महिन्याने किंवा 

जास्तीचा प्रादुर्भाव आल्यास डायमिथोएट 30% प्रवाही 600 मिलि 400 

लीटर पाण्यात (लहान ऊस), 1050 मिलि 700 लीटर पाण्यात (मध्यम 

उस), 1500 मिलि 1000 लीटर पाण्यात (मोठा ऊस) मिसळून फवारावे 

किंवा मॅलथिऑन 50% प्रवाही 800 मिलि 400 लीटर पाण्यात (लहान 

ऊस), 1400 मिलि 700 लीटर पाण्यात (मध्यम उस), 2000 मिलि 

1000 लीटर पाण्यात (मोठा ऊस) मिसळून फवारावे. फवारणीनंतर 10 

ते 15 दिवस ऊस किंवा उसाचे वाढे जणावरांना खाऊ घालू नये. 

6 महीन्यानंतरच्या उसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव आल्यास फोरेट 

10 जी दानेदार 15 किलो प्रती हेक्टरी माती किंवा चांगले कुजलेले 

शेणखत (1:3) याबरोबर मिसळून शेतात पसरावे.

6 ते 9 महिन्यापर्यंतच्या उसाला जमिनीमध्ये वाफसा आल्यास हेक्टरी 

20 किलो फोरेट 10 जी दानेदार प्रती हेक्टरी माती किंवा चांगले कुजलेले 

शेणखत (1:3) याबरोबर मिसळून शेतात पसरावे. 

फोरेट हे कीटकनाशक ऊस तोडण्यापूर्वी 3 महीने वापरू नये.


No comments:

Post a Comment