जिरायती
क्षेत्रासाठी करडई ठरते फायदेशीर
करडई
हे गळीत धान्यपीक अवर्षणप्रतिकारक असून, जिरायती भागासाठी कोरडवाहू
भागासाठी वरदान ठरते. मध्यम ते भारी जमिनीत पुरेसा ओलावा असल्यास करडईच्या पिकास
पेरणीनंतर पाणी देण्याची गरज भासत नाही.
जमीन व पूर्वमशागत - करडईच्या पिकासाठी मध्यम ते खोल भारी जमीन
योग्य ठरते. जमीन चांगला निचरा होणारी असावी. थोड्याफार चोपण जमिनीतही हे पीक येऊ
शकते. भारी जमिनीत 3 वर्षांतून एकदा खोल नांगरट करून,
हेक्टरी 5 टन शेणखत टाकावे. कुळवाच्या उभ्या
आणि आडव्या 2 ते 3 पाळ्या देऊन जमीन
भुसभुशीत करावी.
सुधारित वाण - भीमा, फुले कुसुमा, एसएसएफ 658, एसएसएफ 708, पीबीएनएस
12, नारी 6, नारी एनएच- 1.
- यांपैकी भीमा ही जात करडई संशोधन प्रकल्प, सोलापूर
येथे विकसित केली असून, जिरायती क्षेत्रासाठी प्रसारित केली
आहे.
- चांगले पाऊसमान व ओलितासाठी फुले कुसुमा हा वाण प्रसारित करण्यात आला
आहे.
- डीएसएच 129 हा संकरित वाण संपूर्ण भारतासाठी
तेलबिया संचालनालय, हैदराबाद येथून प्रसारित करण्यात आलेला
आहे.
- बिनकाट्याच्या जातींमध्ये निंबकर संशोधन संस्था, फलटण यांनी नारी 6 हा सरळ वाण आणि नारी एनएच- 1
हा संकरित असे वाण प्रसारित केले आहेत.
पेरणीची वेळ - करडईची पेरणी सप्टेंबरचा दुसरा पंधरवडा ते ऑक्टोबरच्या
पहिल्या आठवड्यापर्यंत करण्याची शिफारस आहे. तसेच, बागायती
करडईची पेरणी ऑक्टोबरअखेरपर्यंत करावी.
- यापेक्षा लवकर पेरणी (सप्टेंबर पहिला पंधरवडा) केल्यास पिकाचे
पानांवरील ठिपके या बुरशीजन्य रोगामुळे फार नुकसान होते.
- उशिरा पेरणी केल्यास (ऑक्टोबरचा दुसरा आठवडा) पीकवाढीची अवस्था
थंडीच्या काळात येऊन, माव्याचा प्रादुर्भाव वाढतो.
बियाणे व पेरणी -
- करडईची हेक्टरी 1.11 लाख रोपांची संख्या
आवश्यक असते. जिरायती क्षेत्रासाठी दोन ओळींतील अंतर 45 सें.मी.
आणि दोन रोपांतील अंतर 20 सें.मी. ठेवत दोन चाड्याच्या
पाभरीने पेरणी करावी. हेक्टरी 10 ते 12 किलो बियाणे पुरते.
- पेरणीपूर्वी थायरम किंवा कॅप्टन किंवा कार्बेन्डाझीम 2.5 ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास चोळावे. तसेच, ऍझोटोबॅक्टर
अथवा ऍझोस्पिरीलम 250 ग्रॅम व पीएसबी 250 ग्रॅम प्रति 10 ते 15 किलो
बियाण्यास वापरावे.
आंतरपीक पद्धत -
अखिल भारतीय तेलबिया करडई संशोधन प्रकल्प, सोलापूर
येथील संशोधनावरून हरभरा (6) + करडई (3) आणि जवस (4) + करडई (2) या
आंतरपीक पद्धती फायद्याच्या असल्याचे दिसून आले आहे.
अन्नद्रव्य व्यवस्थापन - 50 किलो नत्र
(110 किलो युरिया), 25 किलो स्फुरद (156 किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि 25 किलो पालाश (43 किलो म्युरेट ऑफ पोटॅश) प्रति हेक्टरी देणे आवश्यक आहे. ही खते
पेरणीच्या वेळेस पेरून द्यावीत. बागायती करडई पिकास 60 किलो
नत्र + 30 किलो स्फुरद अधिक 30 किलो
पालाश द्यावे.
आंतरमशागत -
उगवणीनंतर 10 ते 12
दिवसांनी चांगली जोमदार रोपे ठेवून विरळणी करावी. गरजेनुसार एखादी खुरपणी व 2 ते 3 कोळप्याच्या पाळ्या देणे आवश्यक आहे.
पाणी व्यवस्थापन-
मध्यम ते भारी जमिनीत पुरेसा ओलावा असल्यास करडईच्या पिकास पेरणीनंतर
पाणी देण्याची गरज भासत नाही. संरक्षित पाण्याची सोय असल्यास, पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी
जमिनीस पाणी द्यावे. दुसरे पाणी पीक फुलोऱ्यात येताना 55 ते 60 दिवसांनी द्यावे. शक्यतो भेगा पडण्यापूर्वी पाणी द्यावे.
- जास्त पाण्यामुळे पीक मोठ्या प्रमाणात मर रोगास बळी पडते. म्हणून
करडई पिकास हलके पाणी द्यावे.
No comments:
Post a Comment